Tuesday, December 13, 2011

रंगमंच.....

परवा माझ्या लहानश्या मुलीचा स्टेज परफोर्मन्स होता , पहिला स्टेज परफोर्मन्स ... आता पहिला परफोर्मन्स म्हंटल्याव़र आई, बाबा, आजी,आजोबा सगळे सगळे झाडून हजर होते त्या कार्यक्रमाला. चार वर्षांची ती चिमुरडी, पण तिचा तो उत्साह , तो आत्मविश्वास... जबरदस्त... चार डांस मधे भाग घेतला होता तिने.

सकाळी ११ वाजता तिला कार्यक्रमस्थळी घेउन आलो. दोन मिनिटात बाय बाबा करून चिमुरडी पसार झाली आपल्या मित्र मैत्रिणीच्या घोळक्यात. दुपारी साडेबारा ला पहिला नाच. मग थोड़ा आराम , मग २ वाजता दूसरा , ३.३० ला तीसरा ... साडेचार ला चौथा...जाम खुश होती ती हे सगळ करताना. पहिल्यांदा स्टेज व़र वावरते आहे असं कुठेच नव्हतं जाणवत. अकरा ते पाच स्टेज व़र जायची तयारी ... मग परफोर्मन्स , पुन्हा पुढची तयारी ... एक चक्र... पण सगळ करताना सोबत होता प्रचंड उत्साह प्रचंड चैतन्य.
आयोजकांनी सरते शेवटी सगळ्या कलाकारांचं कौतुक म्हणुन प्रत्येकाला एक एक टेडीबीयर आणि कैडबरी च एक मोट्ठ चोकोलेट भेट दिलं. काय आनंद ओसंडून वहात होता त्या चिमुर्डिच्या
चेहे-यावरून....

मी सहज विचार करायला लागलो, त्या चिमुकल्यांच्या निरागसतेचा.... जीवनाचा अभ्यासक विद्यार्थी मग सहज जागा झाला माझ्यातला. कित सुंदर असते ना हें बालपण. आम्हाला पण काही शिकता येईलच कि त्यातून.

ही लहानशी चिमुरडी मुलं , पण करतात कसं सगळ अगदी मन लाऊन, मनमोकळेपणानं. काही मिळवायचा, काही साध्य करायचा .... स्वार्थाचा लवलेश सुद्धा नसतो त्यांच्या मनात .
तिचं ते स्टेज वर जाण, बिनधास्तपणे कार्यक्रम देणे त्यात जीव लाऊं , अगदी झोकुन देउनं काम करण, एक परफोर्मन्स झाल्यावर परत उत्साहान दुस-या साठी तयार होण, तयार झाल्यावर रांगेत लागण ... सगळ कसं शिस्तबद्ध , एकच ध्यास , एकच आंस... परफ़ॉर्म करायचंय ... मस्त परफ़ॉर्म करायचंय. कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा नाही आणि हाव पण नाही .... बस करायचंय म्हणजे करायचंय, हाच ध्यास हीच भावना

शेक्सपियर म्हणून गेलाय ... "जग़ हें रंगमंच आणि त्यावरचे कलाकार ... कठपुतल्या , आमची डोर त्याच्या हातात ... या रंगमंचावर वावरताना किती मुखवटे घालून वावरत असतो ना आम्ही
या लहान मुलांसारखा निरागसतेचा मुखवटा नाही घालत पण कधी आम्ही . असं लहान होउन , निरागस होउन , आपल्या भूमिकेत स्वतःला प्रामाणिक पणे झोकुन देऊन जगणार का कधी आम्ही ?









तो टेडीबीयर उराशी कवटाळत , धावत माझ्या जवळ आलेली माझी ती लेक , आता त्या मोट्ठ्या कैडबरी चे लहान लहान तुकडे करून एक आजी ला एक आजोबा ला एक आई ला आणि एक बाबाला देऊन एक मोठा तुकडा स्वतःच्या तोंडात कोंबण्यात मशगुल झालेली होती ...

सुनील जोशी
१३/१२/११







 

No comments:

Post a Comment