#एक_तास
आज हि गुरुनाथ नेहेमी प्रमाणे उशिराच घरी पोहोचला. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात पार चिंबून गेलेला लोकलच्या गर्दी ला समर्थपणे तोंड देत पोहोचला एकदाचा घरात. ही मुंबई पार थकवून टाकते. तो मनाशीच विचार करत होता. उन्हाळ्यात घामाची चिकचिक तर पावसाळ्यात वेगळाच त्रास. असा बरसतो की सुधरु नाही देत. पण एक आहे , पैसे कमवायचे असतील तर मुंबई बेस्ट आहे. तुम्ही मेहेनत करा आणि कमवा हवे तितके पैसे. काही लाईफ नसतेच पण...
आपल्या जवळच्या किल्लीने ल्याच लॉक उघडून घरात आला. दाराच्या उघडण्याचा आवाज ऐकून राधिका जागी झाली. पाण्याचा पेला समोर आला, घटाघटा पाणी पीत त्याने राधीकेकडे नजर फिरवली. काहीसुद्धा ऐकायच्या मनस्थितीत नसलेल्या गुरुनाथला , आज काय काय झालं दिवसभरात त्याची उजळणीवजा कसेट ती ऐकवायला लागली. बस कर यार राधिका , दिवसभराच्या रगाड्यात पकून गेलोय आता तुही किरकिर नको लावूस...
हिरमुसली राधिका एकदम गप्प झाली आणि स्वयंपाक घरात जाऊन ओट्यावर खुडबुड करायला लागली.
वॉश घेऊन गुरुनाथ घराचे कपडे घालायला बेड रूम मधे गेला. कपडे बदलत असताना किलकिल्या डोळ्यांनी त्याला बघत त्याचा सात वर्षांचा मुलगा अथर्व त्याला बोलला...
आलात बाबा?
अं, हो हो आलो की रे ... अरे पण तू अजूनही जागाच आहेस?झोपला नाहीस अजून?
बाबा मला किनई तुम्हाला काही विचारायचं आहे, विचारू?
अं, विचारायचं आहे ? काय विचारायचं आहे, चेहेऱ्यावर आठ्यांचे जाळे पसरवित गुरुनाथ बोलला
त्या आठ्यांच्या जाळ्यान्कडे पार दुर्लक्ष करीत अथर्व बोलला...
बाबा तुम्हाला काम केल्यावर एक तासाचे किती पैसे मिळतात हो?
कां रे तुला काय करायचं आहे , नसत्या चांभार चौकश्या. म्हणे किती
पैसे मिळतात? गुरुनाथ जरा घुश्यातच बोलला.
नाही नाही सहजच विचारलं हो बाबा.
मिळतात हजार रुपये गुरुनाथ त्याच्याकडे बघत बोलला.
बाबा मला पाचशे रुपये उधार द्याल कां ?
हे ऐकताच गुरुनाथ चा पार चढला. आधीच पोटात कावळे कोकलत होते आणि त्यात या पोराची हि बडबड मग घुश्यातच अथर्वला म्हणाला, या साठी सुरु होतं कां हे सगळं. जा गप गुमान जावून झोप, म्हणे पाचशे रुपये उधार देता कां. झाडाला लागतात की काय पैसे.
अथर्वचा चेहेरा रडवेला झाला , डोळ्यातले आसू डोळ्यातच थांबवत तो गुपचूप आपल्या पलंगावर जाऊन पडला.
राधिकेने पटापट पानं घेतली, आणि चटपटीत शेवभाजी सह तव्यावरच्या गरमा गरम पोळ्या भराभर गुरुनाथ च्या पानात आणि तिथून पोटात स्वाहा व्हायला लागल्यात. पोटात गेल्यामुळे आता जठराग्नी जरा शांत झाला आणि मग गुरुनाथ चे डोके जरा शांत झाले, ताळ्यावर आले. तो विचार करायला लागला, या आधी अथर्व ने असे पैसे कधी मागितले नाहीत. त्याला काही हवयं कां? की त्याच्या शाळेत काही कार्यक्रम वगैरे आहे. पण राधिका तर असं काही बोलली नाही.
डोकं आता बरचसं शांत झालं होतं. तो अथर्वच्या जवळ गेला , त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत बोलला , झोपलास कां रे राजा? मी मघाशी ना थोडा टेन्शन मधे होतो न म्हणून तुला रागावलो रे राजा. तुला पाचशे रुपये हवेत ना, हे घे... पण त्याचं तू काय करणार आहेस?
थ्यांक यु बाबा ... म्हणत अथर्व टुणकन त्याच्या अंथरुणातून उडी मारून उठला. आणि धावत जाऊन त्याच्या कपाटातून त्याची पिगी बॅंक बाहेर काढली, आणि त्याच्या टेबल वर ती उलटी करत रिकामी केली. त्यातून सगळी नाणी बाहेर पडली. आणि एक एक करत तो ती मोजायला लागला.
अरे, तुझ्याकडे तर आहेत की इतके पैसे, परत माझ्याकडून कशाला घेतलेस अजून? गुरुनाथ त्याला विचारू लागला.
बाबा माझ्याकडे कमी पडत होते न म्हणून ...
आता माझ्याकडे पूर्ण हजार रुपये जमा झालेत बघा.
अरे पण तुला काय करायचं आहे हजार रुपायांच गुरुनाथ त्याला विचारात होता...
बाबा तुमच्या एका तासाची किंमत आहे ती, तुमचा एक तास मी विकत घेऊ शकतो मी त्यातून... बाबा द्याल का विकत मला तुमचा एक तास? उद्या ऑफिस मधून एक तास लवकर या ना. संध्याकाळी मी एकटाच जेवत असतो , माझ्याबरोबर जेवायला या ना ... नाही नका ना म्हणू हो बाबा हे घ्या हजार रुपये अडवान्स घ्या पण मला तुमचा एक तास द्या ना... द्याल ना बाबा तुमचा एक तास.
गुरुनाथ च्या डोळ्यात पाणी तरळले... आणि बाप लेकांचा संवाद ऐकत राधिका दारात स्तब्ध उभी राहिली.
सुनील जोशी