Wednesday, December 30, 2009

उपसंहार .....

आता मला आई तशी आठवत नाही.....
म्हणजे भेटायला यावी अशी ....
तिला माझ्या हृदयाच्या कवाडात
बंद करून जपून ठेवलय....
ती आता भेटू शकणार नाही हे समजुन
समजूत काढून घेतलीये मनाची...

मागे एकदा मामा दिसला होता मार्केट ला
त्याने सांगितले की ....
आता पर्यंत ती संपली पण असेल
हे एक बी रुजलं ..अंकुरलं ....
आणि उकिर्ड्याच्या बाहेर फोफावलं
हे बघून ती सुखिया जाहली ....

पण मनाच्या त्या कोपरयात त्या स्मृति
आणि त्यात अजुनही आहे माझी ती आई

बिना मेक अप मधली ...माझी आई ...



सुनील जोशी
२७/१२/२००९

पूर्णविराम

रवानगी....

आता हे रोजचेच कळवळणे
मग त्याचा खुप त्रास व्हायचा
मला...आणि माझ्यापेक्षा तिला ....
अंमळ जास्तच ....

काकांच्या नजरा...
माझी सुधरती! भाषा ....
आणि कसले कसले ... प्रोब्लेम न...
तिने मग निर्णय घेतला ...
तिच्या आयुष्यातला कठीण निर्णय ....

मग माझी रवानगी हॉस्टल ला केली
पाठवणीचा मुहुर्त! ठरला ....
पाठवताना तिच्या डोळ्यात ....
तिच्या उरात ..खुप दाटून आलं असावं...

दाखवत नव्हती ..वरवर ....
आतून मात्र रडत होती खुप
माझी आई........

ती यायची मला भेटायला
पण हॉस्टल च्या आत येत नव्हती ...
बाहेरच भेटायची ...
आधी आधी दर आठवड्याला यायची...

मग हळु हळु २ आठवडे ..मग महीना
आणि आता बरेच महीने झालेत ...

माझ्या टेबल वर हां फोटो दिसतोय ना
ती माझी आई ....
बिना मेक अप मधली ...माझी आई ...

सुनील जोशी
१९/१२/२००९
क्रमशः

तो दिवस....

आणि तो दिवस उजाडला ....

संध्याकाळी परसदारी
सागरगोटे खेळत होते मी एकटीच ...

मधेच तो आला ...
माझ्या बाजुला येउन बसला
आणि वर उडालेल्या बिट्ट्या
हवेतच झेलल्यात वरच्यावर....

खूंखार.... लोचट त्याची नजर ...
माझ्या तोंडून आपसुक निघालं ....
भो ****

त्याच वेळी आईचं ही लक्ष गेलं
ती आतून बाहेर आली ..रागान..तरातरा ...

आणि चिडलेला तो मला चिमटा घेउन
नको त्या ठिकाणी ...
पळुन गेला ...

मी कळवळले ...आणि तितक्यात
आईने ही दिली एक मुस्कटात ...

अन मग मला एकदम जवळ घेतलं
हमसाहमशी रडायला लागली ...

तो दिवस मग कळवळण्यातच गेला...

सुनील जोशी
१८/१२/२००९
क्रमशः

धाड़......

त्या दिवशी शाळेतून घरी येत होते
गल्लीच्या तोंडाशीच नीळी मोट्ठी गाडी उभी
काहीतरी गड़बड़ असावी ख़ास......

बाजुच्या गल्लीतुन मनी मावशी ...
तिला ओढत नेत होते
तिचे कपडे धड नव्हते अंगावर
तिच्या मागुन तिची म्हातारी
बोम्बलत येत होती ...
शिव्या शाप देत होती
कडाकडा बोटं मोडत

त्यांच्या मागे तीन गब्रू जवान
चेहेरे झाकलेले ..पण गळ्यात साखळी
पिवळी धम्मक दिसत होती ....
त्यांना नव्हत कोणी पकड़लेलं ....
दोन पोलिशीण बाया लांब उभ्या ....
हसत खिदळत होत्या त्या तिघा बरोबर

एवढ्या गडबडित मामा मात्र दिसला नाही
ऐन वेळी बरोब्बर गायब झालेला ....

मी मग मागच्या मागे गायब
दोन तास भटक भटक भटकले
थोड़ा अंधार पडाया लागल्यावर
घराकडे वळले ......

सगलं कसं शांत शांत होतं आता
आईने आज मेक अप नव्ह्ता केला
गर्दी पण जरा कमीच दिसत होती...

धाड़ पडली होती म्हणे...

सुनील जोशी
१७/१२/२००९
क्रमशः

काकाची ती नजर

दिसा मासी होते मी वाढत
नकळत होते शरीर आकारत
येणार्या पथिकाच्या ओढाळ
नजरेला होते आव्हान देत .....

जवळच्याच शाळेत शिकत शिकत
ग म भ न सहज होते मी वाढत
आणिक त्या दिवशीच्या त्या
काकाची ती नजर..........
चवतालूंन उठांया आईसी कारण

आईचे ते चवताळणे .....
भिग्या बिल्लिचे ते शेर होणे
आपुल्या पिलाचे करण्या संरक्षण
रण रागिणिचे ते अवतरणे

काय रे भ****
आणि मग ते भांडण ....
अन् मग एकदम सहमणे
आणि मग एकदम ते शांत होणे
कदाचित ते तिचे समजणे......
जाहली मुक्त करण्याची वेळ
पिल्लाला पंखाखालुनी .....

सुनील जोशी
१७/१२/०९
क्रमशः

शाळा शिकली ....

मामा तसा चांगला होता
आईने जवळच्या टाकलेल्या शाळेत
मला आणि आम्हा सगळ्याना
सोडून आणून देत होता...

मी ज्या शाळेत जायचे
तिथल्या बाई छान होत्या
पण तो मास्तर ना जरा
ना जरा वेगळाच होता ...

तो मास्तर मला त्या काकांसारखा
वाटायचा .....
आमच्या पैकी काहिना खुप मारत
बसायाचा ...
आणि काही ताया होत्या त्यांचे ना
लाड करायचा .....
शाळेनंतर त्याना अगदी जवळ घेउन
कुरुवाळायाचा.....

त्या मास्तरची म्हणे नंतर तक्रार झाली
तो गेला
आणि त्याच्या सोबत बरय्याच ताया पण
गेल्यात ...

मागे कळालं की त्या मास्तरचा पण मामा
झालाय....

सुनील जोशी
१६/१२/०९

पैदास उकिरड्यावरची .....

पैदास उकिरड्यावरची .....

मी ललिता लीला निर्नाम ....
पैदास माझी उकिरड्यावरची
तसा उकिरडा बराच असेल म्हणा ....

लहानशी होते...
कळत नव्हतं फारसं ....

मामा ..मामाच म्हणायचे त्याला
तो काही काकांना घेउन यायचा

मेक अप केलेली माझी आई...
हसत आतल्या खोलीत जायची
काकांना घेउन........
पडदा ओढून घ्यायची .....

मी रात्री खेळत बसायची
बराच वेळ मझ्यासारख्याच
त्या माझ्या मैत्रीणी ....

त्या काकांचं तोंड झाकलेलं
आई हसत त्याना बाहेर सोडून यायची ...

बरेचदा मला कुशीत घेउन मग
रडत बसायची.......

बऱ्याच उशिरा मेक अप काढायची...
बिना मेक अप मधली ती
ती आईच मला आवडायची ...
ती मला माझी आई वाटायची....

सुनील जोशी
१५/१२/२००९

क्रमशः



Monday, December 14, 2009

नकोस सांगू ...सत्य तू दर्पणा


असं म्हणतात ....
दर्पण झूट ना बोले....

आज त्याच दर्पणी
होते न्याहाळीत स्वतःला
अन् दाखवित होता तो ही
एक सत्य... माझी मीच मला

खुलवित होता गुज मनीचे
दावुनी कळीला गुपित
उमलण्याचे क्षणाक्षणाला .....

एकांत समयीचा.....
माझा तो सखा आरसा.....
दावित होता माझेच
मनोहारी रूप मला

परी पाहून त्या मनोहारी रुपाला
उमगले अजुनी एक सत्य मला
का चिंतित असते अन्
असते कसली चिंता मम माउलिला

वाढत्या वयाची ती किमया
उमलत्या कळीची ती प्रतिमा
दर्पणा परी होत होती त्याची
जाणीव ती मन्मनाला ....

परी नव्हते ते उमलणे
सुखकर....
झेलित त्या नजरांचे वार
असह्य दुष्कर......

वाटले क्षणकाल .....
थांबव रे देवा इथेच हां
काळ सत्वर ...
अणि नकोस रे सांगू ...
सत्य तू ही दर्पणा ...
आवडते परी असह्य ते रे सत्य ....
नकोस सांगू ...सत्य तू दर्पणा ..

सुनील जोशी
१४/१२/२००९

Wednesday, November 11, 2009

मन राधेचे


श्यामल मेघांवरी त्या
सप्त रंगांची ऊधळण होते
मनी अचंभित राधा
निसर्ग नवलाते न्याहाळीते

फूलता विविध रंगी तो
मोरपिसारा त्या काननाते
इंद्रधनुष्यी मन राधेचे
झनक झनक थिरकते ....

किंचित चिंतित ती राधा
त्या सख्या हरिसी शोधिते
ना दिसता ती भय व्याकुळ
त्या कदंब डोही डोकाविते

थाम्बे तो मेघ ही वर्षता
अन् सूर्य ढगा आडुनी पाही ते
शामल कांति आकाशी दिसता
हर्षित राधा ती वेडावते

वेड्या त्या राधेसिं बघता
धुन मुरलीची उमटते
सुरेल धुन ती कानी पङता
गोकुळ हरिमय होई ते....

अन् मग .....

इंद्रधनुष्यी मन राधेचे
झनक झनक थिरकते ....

सुनील जोशी
१०/११/२००९

इथे मी स्वताला राधा स्थानी कल्पुन हां अनुभव घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे .प्रयत्न कृष्णार्पणमस्तु ..........

इन्द्र धनुष्यी मन माझे ........


सप्त रंगांची करीत ऊधळण
रथ रविराज जलदातुनी काढि
सुन्दर त्या मग प्रसन्न समयी
इन्द्र धनुष्यी मन माझे
झनक झनक थिरकत जाई ......

रंग मनाचे रंग धनुचे होती एकाकार
आपसुक अन् धुंद तनु ती घेई लयाकार
रंग सुरांचा सुरेख संगम असा असा होई
अन् मग इन्द्र धनुष्यी मन माझे
झनक झनक थिरकत जाई ......

प्रसन्न वारा, प्रसन्न समय तो
भरून उरे प्रसन्नता चहुकडे
आकाशातील इन्द्रधनुला सुर मुरलीचा अडे
अड़ता सुर मग इंद्रधनू ही गूढ़ आतुनी हसे
अन् मग इन्द्र धनुष्यी मन माझे
झनक झनक थिरकत जाई ......

सुनील जोशी
९/११/२००९

एक विनवणी

प्रणयातल्या त्या शपथा
आज तू आठवुनी जा
दिल्या घेतल्या वचनातें
आज तू निभवुनी जा

इष्कात धुंद मी अन्
इष्कात धुंद तू ही
उतरता धुंद आज ती
वायदे निभवुनी जा

प्रिये प्रियतमे सखे गं
गुंतलो असा मी
शोधुनी सापडे अता ना
वाट ती मुक्ततेची

विनवितो तुला गं
सखे आज वारंवार
अडकली आहे जी तुझ्यात
ती रात्र तू सोडवुनी जा
ती रात्र तू सोडवुनी जा............

सुनील जोशी
२/११/२००९

वसा आकाशाचा


लहानसा होतो ना तेव्हापासुनचं
तेव्हापासुनचं ना हे आकाश
मला मला खुप खुप भुरळ घालायचं

त्यात टीमटीमणारे ते तारे
त्या चांदण्या, तो शीतल चंद्र
आणि हजारो व्याट चा तो सूर्य

चंद्र आवडायचा ...............
मोठ्ठा असून पण कसा शांत
अगदी आई सारखा .. मायाळु

तो सूर्य मात्र सकाळ पासून
कसा लालेलाल ..तापलेला ..आग
अगदी बाबांसारखा... सदा तापलेला

पण आज कळताय ...
जगायला ह्या जगात
दोघे ही कसे जरुरीच ना....

तापलेला सूर्य बाबा
आणि शीतल चंद्र आई
दिवस अन् रात्री ....

सरून दिवस मग रात्र होते
तापल्यावर दिवसभर मगच
रात्री चंद्राची शीतलता मिळते

आता नाही आई ...
शांत शांत आई
शांत चित्ताने गेली
आकाशातल्या घरी

बाबा आहेत आता
ते आजही चालवतात
आकाशातला वसा

दिवसा तापलेल्या सुर्याचा
आणि हो रात्री चंद्राचा पण ....
आणि हो रात्री चंद्राचा पण ....

सुनील जोशी
३१/१०/२००९

Sunday, October 25, 2009

आठवणीचे मेघ

आठवणीचे मेघ

सखे घातलसं कोडं तू मला
आठवणीचे मेघ काळे की गोरे?
आणि तसे कां?

अगं आठवणीचे मेघ ना
नसतात गोरे अन् काळे
ते असतात फ़क्त बरसणारे
सखे फ़क्त बरसणारे ....

धो धो बरसणारे अन्
नुसतं चिंब चिंब करणारे

धो धो बरसतात ते
अन् ..अन् ..त्यात
चिंब चिंब करून जातात


सखे आता तूच सांग गं
अश्या बरसणारया मेघांचा
रंग बघत बसु मी की ....
त्यात चिंब चिंब भिजू गं?

सखे आता तूच सांग मला

रंग असेना का कुठलाही
काय करायचं आहे गं आपल्याला?
चिंब भिजायचं अन् ...अन्...
मनमुराद आनंद लुटायाचा

कि, कुठला आहे रंग
शोधत बसायचं आणि
हां ही क्षण घालवून बसायचा ?

अणि हो तू विचारलसं
म्हणून .....
भान आलं न तेव्हा
रंग बघायाला गेलो तर
तर तो पर्यंत ना सखे
ते मेघ विरून गेले होते गं
विरून गेले होते ....

सुनील जोशी
२५/१०/२००९

Saturday, October 3, 2009

काही अजुन चारोळ्या

10.
रक्ताळ लेल्या जखमा
आज त्यांचाच जमाना आहे
चिरंतन जखमी अश्वथाम्याचाच
आज गड्या बोलबाला आहे

11.

लोकशाही लोकशाही ...
झाली आता ठोकशाही
ज्याचा हाती काठी मोठी
तोच येथे राज्य करी

12.
पोरगं किती ही मोठी झालं
तरी ते पोरचं असते
बापा पेक्षा शहान झालं
तरी त्यान बापाला शिकवायचं नसतं

13.
माय मराठी आशीष दे
आम्हा सेवेचे वरदान दे
करू सेवा तुझी मनोभावे
हाताला ह्या यश अन् सामर्थ्य दे

14.
मन जाणलस माझं
अस वाटलं जेव्हा
फुलून आला होता
गुलमोहोर दारिचा तेव्हा

15.
गुलमोहोर तर फुलला होता
पण तुझं जाणुन घेणे होते बेगडी
त्या गुलमोहोराला कळालं जेव्हा
तो पण तोंड लपवाया लागला तेव्हा

16.
एकटा मी सक्षम आहे
कुठेही लढायला न् काही ही पेलायाला
गांडूलांच्या साथी पेक्षा
एकटाच मी तसा बरा....

17.
एकांतवास काय असतो
हे लिहून समजू शकत नाही
अनुभवून झाल्यावर ना
सांगायची पण हिम्मत होत नाही
नाही म्हणजे नाही ...
जन्माला तो आला
रडतच पैदा झाला
आईने वटारले डोळे
अन् म्हणाली नाही
नाही म्हणजे नाही

सगळे होते हसत
तू पण हसत राही
आता रडलास ते रडलास
आता रडायाचे नाही
नाही म्हणजे नाही

लहान बाळ तो पण
धाक किती बाई
भूक लागली कळवळुन
तरी रडायचा नाही
नाही म्हणजे नाही

अत्यंत शिस्तीत
आईच्या कड़क
लहानाचा मोठा
तो होत जाई
सगळे कसे आखीव
बदल मुळी नाही
नाही म्हणजे नाही

आई सांगेल ते प्रमाण
त्याच्या बाहेर दुनिया नाही ...
दोस्त मित्र चिडवित
मामा'स बॉय म्हणत
हरकत नाही ...
पण आईने सांगितले ना
नाही ....
नाही म्हणजे नाही ...

कधी तरी वाटायचं
बर्फाचा गोला खावा ...
पानीपूरी खावी ...
पण आईने सांगितले
तब्येत ख़राब होई
म्हणून खायचे नाही ..
नाही म्हणजे नाही ...

अजुन मोठा झाला ..
कॉलेज ला आला
घरचा जरा रईस ...
मित्र झाले गोळा
आई ने सांगितले ..
ह्याचाशी कर मैत्री
अन् त्यांच्याशी नाही ....
नाही म्हणजे नाही ..

प्रेम पण त्याने केले
आईने सेलेक्ट केलेल्या मुलीवर,
जीचे त्याच्यावर प्रेम होते
ती आईला चालत नव्हती
आईने सांगितले ही चालेल
ती नाही
नाही म्हणजे नाही ...

यथा वेळी संसार ही थाटला
बायको पण आली ....
तिच्या बरोबर सिनेमा ला जाऊ का
आईला विचारी
आई म्हणाली नाही
नाही म्हणजे नाही ...

काय गं तू आई
माझा गं अगदी
कसा बोन्साय केलास ...
एक पण निर्णय
मला कसा घेता येतच नाही?
नाही म्हणजे नाही ...

खरच गं अगदी नाही
नाही म्हणजे नाही ...

सुनील जोशी
१८/०६/२००९

कल्पांत ...... होणारच नाही....

मी ठरवल आहे की
मी वाट बघणार आहे
कल्पांत होणार नाही
कारण तू येणार नाही

मी ठरवल आहे की
तू येणार नाहीस
कारण ....
मला जगाची काळजी आहे
एकट्या माझीच नाही

कल्पांत झाला तर ...
तर मी राहणार नाही
तुही राहणार नाहीसच

तुझ्या येण्याने जर
असेल होणार कल्पान्त
तर ...
तर मी तुझी वाट बघणार नाही

आणि म्हणून मी ठरवून टाकलय
की आता कल्पांत होणारच नाही ....

सुनील जोशी
१/१०/२००९

ब्राह्म मुहूर्त ...

अवसेची रात...
किर्र आवाज...
अन् भयाणता वाढवणारा
कूट्ट अंधार

दुरवर मिणमिणता दिवा
झोपडीत दाट्लाय धुर
धुरात खोकत.. भाकरी थापत
बसलेली ती... पाठमोरी..

त्याची एंट्री ...भेलकांडत....
एका लाथेत भाकरीचं टोपलं...
आकाशाला गवसणी घालायला निघालयं

एक अर्वाच्य शिवी हासडत ....
दूसरी लात तिच्या पेकाटात
रात किड्यानच्या किर्र आवाजाला
चिरत जाणारी एक आर्त किंकाळी

आदळ आपट ... झटापट...
एक नीरव शांतता ....

फटफटतयं ....
तयारी एका महाप्रयाणाची ....
सरत्या अवसेच्या ब्राह्म मुहुर्तावर ...

सुनील जोशी
०२/१०/२००९

त्या जंगलात ....


त्या जंगलात ....
भर दुपारी
नीरव शांतता
मैलभरावरच्या नदीच्या
लाटान्चा सुस्पष्ट खळखळाट

त्या जंगलात ...
भर दुपारी .. अंधार गुप्प
तळपत्या वैशाखात
झेलुन वरच्या वर
केली किरण बंदी .........

त्या जंगलात ...
शोधासाठी मी अतार्क्यच्या
त्याच वेळी पावलान्वरून
एक सळ सळ
एक थंड स्पर्श ...
गोठवणारा .....

त्या जंगलात
कधी आणि केव्हाही
एकोपा ..सगळ्या सगळ्यान्चा
पण लागली आहे चाहुल
एका नष्टचर्याची ...
माणुस शिरलाय म्हणे जंगलात ....
त्या जंगलात

सुनील जोशी
२/१०/२००९

काही चारोळ्या ....

1.
मोगरा फुलतो
सुगंध दरवळतो
आठवणी जागवतो
तुझ्या नि माझ्या ....

2.
आठवणी तुझ्या नि माझ्या
आपल्या पहिल्या प्रितीच्या
साक्षीला अन् होता तो
गंध धुंद मोगरा .........

3.
गंध वेडी तू
अन् मी बेधुंध...
फुलली प्रीत अशी
साक्षीला मोगरा ....

4.
मोगर्याने अन् काय केले?
तुला सजवले, मला फसवले
इश्कात जाहलो वेडे असे की
तू न् मी वेगळे ना उरलो ....

5.
इश्काची किमया अशी की
वेडावुनी पुरती ती गेली
सांज सकाळ ना कळाली
क्षणा क्षणात फ़क्त तीच उरली

6.
तीच उरली असे वाटले
वाटुनी असे ही गेले ....
नसती जर का ती तरी
मग काय असते जाहले ?

7.
काय हो होणार आहे
प्राक्तना पलिकडे ...
परी विचार मी करू कशाला
हेच झाले जे सुप्राक्तन माझे

8.
प्राक्तन ..ते ही असे का?
सुप्राक्तन अन् कुप्राक्तन असे
पण मी कशाला करू चिंता
नको नको त्या प्राक्तनाची?

9.
चिंता ... चिंता अन् चिता
भेद फ़क्त अनुस्वाराचा
जाळती दोन्ही परी
एक सजीवा अन् एक निर्जीवा ...
( मूळ संस्कृत सुभाषित आहे )

सुनील जोशी
३/१०/२००९

Saturday, September 26, 2009

काय सांगू बाप्पा!!!


हप्ता हप्ता कामासाठी
दौर्यावर थे जातेत...
आन घरी आले का
त्या क्यामप्युटर वर
जावुन बसतेत
घरात कोनी हाय
ह्याची सुध त्याहिले नसते
काय सांगू बाप्पा
हें असे काहुनच वागतेत?

मया मंतो चला
बिग बजाराले जावू
जरासक उलिसक
भटकून बी येवू
तर मन्ते कसे
माही कंबर हाय दुकते ...
आन दोस्ताचा फोन येते
त रात भर उन्डाराले जाते
काय सांगू बाप्पा
हें असे काहुनच वागतेत??

गावभर च्या लोकांशी
फोनवर गुलू गुलू बोलतेत
दुनियादारी साठी लई
टाइम ह्यायिले रहायते
आन मी म्हनलं का
चाल मह्या भैनीकडे जावू
त बुवा वसकन माह्यावर
धावुनच येते .....
काय सांगू बाप्पा
हें असे काहुनच वागतेत???

सुनील जोशी
२७/०९/२००९

असी काउनच वागते??


काउन सन्यान बावा
हें असी काउनच वागते ..
माह्या मनात असते काई
त करतेच उलटंच हें बाई
समजत नाई असं काहुन
वागते ह्ये बाई ..??

फिल्ल्म्च्या हिरवाईन वानी
रहावं थीन असे मले वाटते
त आंगभर नव्वार नेसून
डोक्श्यावर पदर बी वढते
अस्सा घूँघट ओढून थे
माह्या सोबत गाव भर हिंडते
काय जिन बावा थे
माह्यासी असी काउनच वागते ..

आता मले पसंद हाय चटक मटक
त हें रांधते भेन्डकाची भाजी
आन बापुजिच्या म्होरं मले
जबर्दस्तींन खायाले बी लावते
पदराआड़ टोंड लपवून अधिक
खुसू खुसू बी हासते ....
काय जिन बावा थे
माह्यासी असी काउनच वागते ..??

मया म्हनलं चाल शिनिमाले जावू
त ऐन वक्ताले मह्या पचकाच करते
बुढा बुढी सांग मले मंदिरात नेते
मंदिरात नेते आन परवचन आइकवते
काय जिन बावा थे
माह्यासी असी काउनच वागते ..??

दिस जाते असा अन् रात मांग व्हते
बाजिवर पडल्या पडल्या मग घोराले लागते
दिवसा त दिवसा रातले बी पचकाच करते
काय जिन बावा थे
माह्यासी असी काउनच वागते ..?? असी काउनच वागते....???

सुनील जोशी
२७/०९/२००९

Friday, September 25, 2009

कातर वेळ.... कातर वेळ ....

अधरांची थर थर...
डोळ्यांची भाषा ....
सांगायचं आहे बरच काही ....
काही सुचतच नाही

कातर वेळ

तुझी माझी पहिली भेट
अशीच ती संध्याकाळ ...
हूर हूर वाटे जीवा

कातर वेळ

कशी होइल आपली भेट...
कसा असशील तू
कशी होईल Adjust मी
एक अनामीक भीती ...
प्रेमात पण भीती...???

कातर वेळ ....

घेतलस जवळ मला
आणी प्रेमाने स्पर्शिलस
हुरळुन गेले मी
पण मनात एक अनामीक डर...

कातर वेळ

घाबरलेले मी ...
अन् आश्वासक तू
तरी मनातल्या मनात
मीटलेले मी ...
बस ...

कातर वेळ.... कातर वेळ ....


सुनील जोशी
२४/०६/२००९

इसवी सन..... ३००९

वांद्रे वरळी सेतुच्या
ऊदघाटन सोहोळ्याचे हजारावे वर्ष ...

इथे म्हणे हजार वर्षांपूर्वी
एक सेतु बांधला होता
काही अवशेष दिसताहेत
ऊदघाटन पण केलं होतं......

अरे हट ...
काही ही सांगता ....
असा काही सेतुच नव्हता
आणी असे कुणी लोक पण .....

नाही इथे सेतुच होता ...
नव्हता नव्हता ...नव्हता...
इतिहासात आहे ...
इतिहास खोटा आहे ....
सेतु होता ...
सेतु नव्हता....
होता....
नव्हता...

ए गप...नव्हता... आणि आता आम्ही सत्तेत आहोत ...
आणि आम्हाला इकडे... असं असं असं..... करायचं आहे
मग सेतुची जागा सोडून करा ना ...
नाही इथेच करणार
करू देणार नाही
करणारं करणारं ..करणारंच ....
करू देणार नाही ... बघू कस काय करता ते...
करतोच बघा ...
आंदोलन करू ..दंगल होईल ...

अरे .....हजार वर्ष झालीत तरी ....
हम नाही सुधरेंगे ....


सुनील जोशी
०१/०७/०९

ती एक वस्ती ....


ती एक वस्ती गावकुसा बाहेरची ,
गावाच्या उकिरड्याची ,
गावाला नको असलेली घाण फेकण्याची...
होती आमचीही वस्ती ..( की घाण )....
त्याच घाणी मधे..

काहीतरी घडले ....
आमच नशीब बिघडल ....
एक दिवस मोट्ठे मोट्ठे बुलडोझर तिथे आले ..
ऐ गंदे लोगो... घाणेरडे कुठले ... घाणीत राहता...
निघा इथून... काय घाणीत राहता रे ...

चानी कळवळली.. तीचा म्हातारा करवादला..
बूलदोझर आमच्या झोपड्यातुन फिरू लागला ...
हळु हळू घाण साफ होवू लागली ..
वरतून वरूण राजाची ही कृपा झाली
चानीच्या डोळ्यांनाही धारा लागल्यात
ऐ चला बोम्बलू नका ....
आता सेठ येतील पळा... इकडे येऊ नका पुन्हा ...
भूमी पूजन आहे ५७३ व्या ले आउट च..
गाव कुसा बाहेरची घाण नामशेष होऊ लागली ....
कारण शहर वाढू लागल...
आणी घाणीला आपल्या कवेत घेउन ....
आमच शहर गाव कुसा बाहेरच्या वस्तीला गिळायला पुढे पुढे धावू लागल...


सुनिल जोशी

15/05/2008

सोहोळ्याचा मेळावा


सोहोळ्यान्च्या आठवणी
अन् आठवणींचे सोहोळे
गोत होते झाले गोळा
परी राहिलो मी एकटा

झरल्या हस्ताच्या धारा
लागली होती जणू झड़...
चिम्ब भिजलो त्या पावसात
परी राहिलो मी कोरडा ...


आलो होतो एकटा
जातानाही एकटा
स्वागताला अन् विदाईला
परी जहाला तो सोहोळा


जीव येई जन्मा
घेउनी तिकिट परतीचे
जाता येता परी होतसे
सोहोळ्याचा मेळावा


सुनील जोशी
१८/०९/२००९

एकदा तरी मला


एकदा तरी मला असं
जगुन बघायचय...
खळाळणार्या झर्यासारखं
वाहून जायचय

खळाळणार्या झर्याचं
पाणी नसते स्थीर
अगदी तसचं माझ्या
मनाला करायचय...

निर्झराचं पाणी
असते बाकि निर्मल
तसचं अगदी माझ्या
मनाला ठेवायाचयं

एकदा तरी मला
असं जगुन बघयाचयं

सुनील जोशी
१५/०९/२००९

माझ्या मेघश्यामा


राधा मी गोकुलीची...बावरी ...
रमले रे मी नीलाईत तुझ्या...
की त्या बासुरीच्या नादात ...
माझ्या मेघश्यामा ..रे माझ्या मेघश्यामा ....

विश्वी त्या विहरता विहरता ....
भासते रे की विसरलास तू मला ...
परी गूढ़ असे ते नाते अपुले
कसा रे विसरु शकशील मला...

मज भास् निरंतर होती ...
की होतसे मी स्वप्नी तव रममाण ...
कले ना मग मज स्वप्न काय अन सत्य काय? ...
काय रे किमया त्या तव नीलकांतीची

अन त्या मधुर स्वर्गीय सुरांची .....
कशी रमते मी रे...
अन जाते होउन एकरूप ...
नकळत मजला मी जाते विरघलुनी त्यात...

भान येता अणिक परती येते ....
मी माझ्या ...हो केवळ माझ्या त्या गोकुळात...
आणिक शोधत बसते रे मी ...
माझ्या हरवलेल्या मेघश्यामा .....
यमुनेच्या नीलडोही .....
नीलकांतिच्या केवळ माझ्या मेघश्यामा.....


सुनील जोशी
१८/०९/२००९

नाते......


काल रात्री मम स्वप्नी आला ...
साक्षात् परमात्मा ..
राधेच्या गोकुळीचा नंदलाला ....
होती राधाही सोबतीला ...
बघता गोकुळीच्या या अद्वैताला ....
मनी संतोष अपार झाला .....

मनाशी बांधून खुणगाठ ...
विचार केला करुया बोलते ह्या दोघांना ....

भगवंता तू जरी कान्हा विश्वाचा ,
तान्हा यशोदा माउलीचा ....सारथी त्या पार्थाचा......
परी ना कले मज पामरा कोण तू ह्या राधेचा....
कोण तू ह्या राधेचा ???....

गूढ़ हसुनी तो बंसीधर वदला.....
वत्सा ,अरे मलाही नाही रे कळले ,
कोण मी ह्या राधेचा....
कोण मी ह्या राधेचा???....
हृदयाशी रक्ताचे जे नाते ....
श्वासाचे जीवनाशी जे नाते...
लवणाचे जेवणाशी जे नाते ...
गोकुलीच्या राधेशी ते माझे नाते.....

मी वळलो स्वप्नातच राधेकडे..
प्रश्न विचारावा म्हणुन बघितले....
राधेचे ते सलज्ज डोळे....
किन्चितश्या पाणावलेल्या कडा....
शब्दही ना वदता ...
सांगुन गेले काय ते राधेचे कृष्णाशी नाते...
काय ते राधेचे ... श्रीकृष्णाशी नाते...


सुनील जोशी
१८/०९/२००९

Wednesday, September 16, 2009

अस्वस्थ वर्तमान ....

कोसळणारा तो पाउस
एक आनंद क्षण
एक लय एक ताल
अन् इकडे श्वासागणिक धाप
अस्वस्थता ........

वर्तमान एक सत्य
भूत भविष्य आभास
एकलेपणाचं भूत
तसलचं काहीसं भविष्य

विसरत चाललोय मी
जगण अन् अनुभवण वर्त्तमान

वसा घेतलाय
माणसं बनवण्याचा, घडवण्याचा...
वसा???.....

वसा निभावतान्ना....
त्रास देतात आठवणीभूतकाळाच्या ....
अन् निष्कारण सतावतात
चिंता भविष्याच्या

स्वताचाच भूतकाळ
भूत बनून मानगुटी बसतोय
आन त्यात विसरून चाललोय
जगण आजचही ....

कळतय मला माझं असं वागण
नासवतय माझा उद्याचा भूतकाळ
काय करू पण ...
समजतं, ..उमजत नाही

ह्यालाच म्हणतात ना ते..
अस्वस्थ वर्तमान ....
जगण्याची अपरिहार्यता ...
की.. की.. आणखीन काही ???

सुनील जोशी
१७/०९/२००९

Friday, September 11, 2009

देवाची चुक

त्या दिवशी मला देव दिसला ..
देवबाप्पा ... चक्क रडत बसलेला...
स्वतःच्याच गूढ़घ्यात मान खुपसून बसलेला
अन् चक्क हुंदके देत रडत बसलेला
मी एक साधा माणुस .. सर्व साधारण माणूस
आत्ता देवच रडतोय बघून... गेलो हबकुन ....
खुप विचार केला .. खरच खुप विचार केला
अन् मायेन बाप्पाच्या पाठीवरून हात फिरवला
अगदी लहानपणी आई फिरवायची ना
माझ्या पाठी वरून तस्सा .....
फिरताच तो मायेचा हात ..थांबलं एकदम रडण ....
आणि बघितलं वर बाप्पान ...
मी विचारलं... बाप्पा काय झालं?
काही त्रास होतोय का रे?
का रे देवा तुझ्या डोळ्यात पाणी? का रे?
गंभीर आवाजात बाप्पा बोलला त्वरीत ...
हें हें आसू आहेत ना ...
त्यात ना तुझे हे सगळ जग जाणार आहे वाहून...
मी हबकलोच ...एकदम थबकलो ...
अन् बोललो ...
का ? का रे बाप्पा असं रे का?
तर बोलला बाप्पा ...
अरे मीच ना केलाय निर्माण हें जग ...?
पण काय झालय ना
निर्माण करता करता एक चुक झालिये रे माझ्याकडून...
देवाची पण चुक... माझ्या चेहेर्यावर एकदम आनंद छटा...
बाप्पा बाप्पा ..म्हणजे देव पण चूका करतो तर ...
हो रे हो ..देव पण चूका करतो रे ... देव बाप्पा बोलला
अरे हें जग निर्माण करतांना माणुस बनवला ना ...
तीच रे तीच माझी सगळ्यात मोठी चुक
आता चुक तर झालेली आहे ना ..?
मग निस्तारावी पण लागेलच ना ....?
म्हणून ना मी रडत बसलोय बघ ..
माझ्या अश्रुंच्या महापुरात ना ...
हे सगळ जग धुवून काढेंन मी ...
आणि धुवून काढल्यावर ना हे जग
पुन्हा अशी चुक मी करणार नाही ...
त्या धुतलेल्या जगात ना मी ....
मी माणुस कधीच बनवणार नाही ...
माणूस कधीच घडवणार नाही ....
सुनील जोशी
११/०९/२००९

Thursday, August 27, 2009

मी एक स्त्री

मी स्त्री... एक स्त्री ....
असते कधी माया ..कधी ममता
कधी दुर्गा अन् कधी रणचंडी
कधी मी राधा अन् मीरा ही ...
मीच कुंती अन् मीच द्रौपदी

........
द्रौपदी ...
पाच नवर्यांची पांचाली ....
कुंती मातेची सुन ...
माता कुंती ....
भौतिकार्थाने पत्नी
एका अशक्त राजाची
अन्... नियोग योगे...
जाहली मार्गदर्शीका माझी

....
प्रेम माझे सव्यसाची
परी संसार प्राक्तनी पाचांशी...
मनोमनी जरी वरिला एक
शरीराचे ह्या धनी अनेक
कौरवा वाटे.....
आपुलाही का न वाटा???
मी अबला
परी माझी लाज त्या सारथ्याला...

........
आज ही जगते आहे मी ...
अगदी तुमच्या आजुबाजुला
होउनी कधी राधा ..कधी मीरा
अन् बरेचदा भूमिकेत त्या द्रौपदीच्याही ...
करीत धावा .... त्या एका ..
त्या एकाच परमात्म्याचा...


सुनील जोशी
११/०७/०९

कृष्ण माझा कृष्ण तुमचा

कान्हा सकल विश्वाचा
माखनचोर नंदलाल यशोदेचा
चित चोर कान्हा तो गौळणीचा
खेळुनी लीला अगाध गोकुलिला
जहाला कृष्ण आम्हा सगळ्यानचा

कृष्ण मीरेचा , कृष्ण राधेचा
कृष्ण सखा तो द्रौपदीचा ...
भक्तिकारणे कृष्णरुपी लीन मीरा
प्रेमकारणे कान्ह्याची जाहली राधा
धावा करीता लज्जा रक्षण्या
धावत येई कृष्ण सखा पांचालिचा

कृष्ण मित्र सुदाम्याचा....
सखा गोकुळी गोपजनांचा
आवडी करे पाहुणचार पोह्यांचा
अन् गोपालकाला त्या यमुना तिराला
मैत्री करता भेद ना उरला
गोप ..सुदामा कृष्णची झाला

वाजवी रानी सुरेल पावा
कृष्ण सखा धेनु- वत्सांचा
सवंगडी घेउनी सोबतीला
दावी गोकुळी अगाध त्या लीला

कृष्णाची हे विविधा रुपे
मोहविती सतत मनाला
अन् आपसुक येती शब्द मुखी की
कृष्ण माझा कृष्ण तुमचा
कान्हा सकल विश्वाचा

सुनील जोशी
२४/०७/२००९

लाचार

दुनिया झोपलेली
पण वस्तीत हालचाल सुरु झालिये

पहाटेच्या पहिल्या पारी
झाकटीतच छिन्नी हातोडयाची खडखड
माणसं राकट ..बाया धडधाकट ....
तान्हुलं झोळीत ..निवांत निपचित

सूर्य चढ़तोय वर वर ..हळुवार ....
काळ्याकभिन्न देहातुन घामाच्या धारा...
अंगावरचं चिरगुट ओलंगच्च ...
आणि ...
स्त्रीत्वाचं लक्षण झाकणार वासन
सतरा ठीकाणी फाटलेलं ....

तान्हुल्याची हालचाल ...
किनरया आवाजातली किरकिर ...
आणि मग वाढत जाणार केकटण ...

दोन शिव्या अर्वाच्य... हासडत ...
तन्हुल्याला घेते उरावर...
नसलेल्या पदराखाली तान्हुलं ....

तान्हुलं ओढ़ते ... जीवाच्या आकांतानी...
लोचुन लोचुन... ओढून .... थकते

जाणारा पथिक ..हौशी...
हसून लोचट पणे बघतो ...
आणि आधीच थीगळ लावलेली चिरगुट
थोडसं अजुन वर सरकवून ...
ती पण लाचार पणे हात समोर पसरते ...
मिळाला रूपया तर तेवढाच खरा ...
मीठ मिर्ची च्या कामाला ....

आणि तिकडे तो राखणदार ....
तिच्या कुंकवाचा धनी
एक पौव्वा लावून ...
निपचित पडलाय ...
अगदी सातवे आसमान पर ....

सुनील जोशी
०१/०७/२००९

मी खरं सांगू काय...

मी खरं सांगू काय...

आजकाल ना काही करावसं वाटच नाही
खोटं जगायचा येतो कंटाळा
आणि खरं जगण्याची हिम्मतच नाही
जगतोय कसा ते कळतच नाही

दिवसा मागुन दिवस उगवत जाई
गेल्या दिवसाचा काही हिशोब नाही
अन् येत्या दिवसाचा काही विचार पण नाही
काय सुरु आहे काही कळतच नाही

खर सांगू काय ... काही होतच नाही
हरी काही मला खाटल्यावर देतच नाही
अन् मर मर काम करायची सवयच नाही
कसं होईल माझे काही कळतच नाही ...

असं आहे सुरु ...
आणी राहिलं पण असच
नक्की काही नाही ...

खरं सांगू का ...
काय होतयं ना ते काही कळतच नाही
कळतच नाही


सुनील जोशी
१७/०८/२००९

वर्षाव कृपेचा .....

कडाडती वीजा त्या लखलखत
अन् होई गडगडाट प्रलयंकारी
धो धो कोसळती पावसाच्या सरी
अन् कोपे माय यमुना ती अघोरी

सावरण्या अन् सुधारण्या ह्या जगताला
अवतरे जगी ह्या .... हां जगन्नाथ ....
होवुनी आठवा .. उदरी माता देवकीच्या....
नक्षत्र रोहिणी अन् वद्य अष्टमी श्रावण...
घेई अवतार मर्त्य लोकी .. तारण्या... ह्या मातेला
तारुनी सुजन अन् निर्दालुनी खल ...
होतसे त्राता ह्या जगताचा ... देवकीचा आठवा ...

ये रे ये कान्हा परतून तू ये रे ...
परत आज अवतार तू घे रे ...
तारण्या आज ह्या मातेला ..
तुझ्याच त्या यमुनेला...

दिसती आज सर्वत्र रे
अवतार ते कंस चाणूरांचे
भरल्या सभेत ते करिती ते
विटम्बना भारत मातेची
नव कौरव हे कसे रे ....

ये परत तू अन् चालव
चक्र सुदर्शन तू रे
वाचव रे वाचव लाज आज
न पेक्षा काय रे करू आज अपेक्षा रे
कृष्णा खरच रे खरच ये तू जन्मा
अन् सोडव रे सोडव आज ह्या मातेला
जाचातुनी ह्या ...
अन् कर वर्षाव तुझ्या कृपेचा .....


सुनील जोशी
१३/०८/२००९

बरेच दिवस झालेत ....

बरेच दिवस झालेत ....
पाउस असा पडलाच नाही

अशी मस्त् बरसणारी तू ....
तुला पण प्रदुषणाची बाधा झाली की काय ?

आठवत असतीलच की तुला
ते दिवस ..तुझे माझे ..चांदण्यातले
हातात हात गुम्फुन नदी किनारी फिरण्याचे ...
आणी अगदी सहज गत्या
माझ्यात सामावून जाण्याचे

कसलं प्रदुषण झालय कळत नाही
पण खरच .....

बरेच दिवस झालेत ....
पाउस असा पडलाच नाही


सुनील जोशी
१०/०८/२००९

राधेचं स्वप्न....

राधेचं स्वप्न
स्वप्नात गोकुळ
गोकुळी आनंद
नंदाघरी आलाय
गोकुलीचा छंद ....

राधेचं स्वप्न
स्वप्नात सुर
सुर वेणूचे
राधा दंग
आनंद ..

राधेचं स्वप्न
स्वप्नात मोर
मोर बसलाय शिरी
फुलवून पिसारा
पिसारयात गोपी
ठाण मांडून बसल्या
डोई वर कन्हैय्याच्या

राधेचं स्वप्न
स्वप्नात श्वास
आणि निश्वास
श्वासा निश्वासा गणिक
बासरीचे सुर
राधाच बासरी
बासरी अधरावर
राधा कान्ह्याच्या....

राधेचं स्वप्न
स्वप्नात एकरूप
सगुण साकारात
कृष्णाच्या श्वासात
बासरीचे सुर ...
ऐकू येतय....
राधे गोविन्द ..
राधे गोविन्द

सुनील जोशी
१०/०८/२००९

बरस रे घना

एकली मी एकली मी एकली रे एकली
घनव्याकुळ घनव्याकुळ मी युगायुगांची
बरस असा रे बरस असा घना तू घनघोर
तृप्त करुन रे टाक आज धरतीचे तन अन् मन

युगाविरहीणी मी रे कधीची
त्या युगी होते राधा
या युगी झाले मीरा
तृप्त अतृप्त हा खेळ चालला
माझ्या ह्या प्राक्तना....

तू येशी अरे कधी अन् करिसी
शिडकावा मायेचा ...
त्या शिरव्याने वाढे हुरहुर
अन् पुन्हा नव्या वेदना ....

ही हुरहुर करून टाक रे अशी तू शांत

बरस असा रे बरस असा घना तू घनघोर
तृप्त करुन रे टाक आज धरतीचे तन अन् मन

सुनील जोशी
०७/०७/२००९

बोलली अबोली ....

बोलली अबोली ग
बोलली अबोली

काय होते पोटात
आज आले ओठात
असा होता निर्धार
नाही काही बोलणार
परी होता अनिवार
बोलली अबोली ....

बोलता परी तिला
समजुनी गेले
आपले आहे
काहीतरी चुकले....
सारे पाणी गेले
पालथ्या घड्यावरी
तरी करुनी निर्धार
बोलली अबोली
ग बोलली अबोली

अबोलीचे बोल
लागले जिव्हारी
परी नव्हते तिला
त्याचे ग काही
तिच्या त्या जखमा
वहाती भळाभळा
त्यांची न होई
जाण कुणा...
बोलली अबोली
ग बोलली अबोली


सुनील जोशी
२८/०४/२००९

आस

आस एक अंतरी
व्हावे तुझी बासरी
होउनी तव बासरी
विराजावे अधरावरी....

अंतरीची ती आस
व्हावे तव निश्वास
अन् त्या निश्वासा सवे
सुर बासरीचे मी व्हावे

सुर उमटता बासरीतुनी
रमती प्राणी पक्षी रानीवनी
मंजुळ नाद घुमे सदनी
होई मी दंग स्वप्नरंजनी

स्वप्न रंजनी अन् मग मी
असते विराजीत तव अधरी
एक बासरी .. माझ्या कान्ह्याची
निश्वासा सवे तव उमलते मी


सुनील जोशी
१५/०७/२००९

किमया

प्रभात समयी सुर वेणूचे
घडे आक्रित अन् गोकुळी ते
दोहण्या बसती गौळणी त्या
समोर ना धेनु परी वृषभा त्या

सुर वेणूचे राना वना
विसरली धेनु वत्स पान्हा
मुरलीची तव किमया कान्हा
समयी रे त्या मध्यान्हा

सांज समयी तव वेणु नादे
कृष्णा रंगले अवघे गोकुळ ते
रमता गोकुळी भान ना उरे
व्याघ्र हरिणी ही सोबत घडे

रात्रीच्या त्या शांत समयी
मंदावत ज्योती त्या समई
सुर वेणूचे पङता कानी
राधा भासे ती कृष्ण सदनी

सुनील जोशी
२३/०८/२००९

तो गंध धुंद मोगरा ....

बेभान त्या क्षणांचा
मूक सोबती तो
श्वासागणिक बेधुंद करी
तो गंध धुंद मोगरा ....

प्रेमात सोबती तो
विरहातली व्यथा तो
जाता इथुनी तेव्हा साक्षीला
तो गंध धुंद मोगरा

केवळ उरले आठव
अन् विरहातले उसासे
त्या उसास्यातही जाणवे
तो गंध धुंद मोगरा

तुला मिळाले तुझे जे
अन् उरले प्राक्तन माझे
त्या प्राक्तनी ही उरला
तो गंध धुंद मोगरा

इष्काच्या मैफलीत
चढलो आज ही माडी
सजवितो मनगटाला
तो गंध धुंद मोगरा

तो गंध धुंद मोगरा ......

सुनील जोशी
२२/०८/२००९

ए आठवते तुला??

ए आठवते तुला??
ती संध्याकाळ ..चौपाटी वरची ..
तू आणी मी ... मी आणि तू ..
आपला नेहेमिचाच वाद ..
मग..... निशब्द संवाद ..
मी थोडीशी नर्वस ...
तू बराचसा कातावलेला...
कशी काढू हिची समजूत ..
कधी कळेल हिला ?...
अश्याच कसल्याश्या विवंचनेत ...
हसत खेळत घरातून निघालेलो आपण
आणि आता दोन तोंडं.. दोन दिशांना..
तितक्यात तुला दिसला तो मोगरावाला...
तुझं ते झपझप जाण..
पटकन मोगर्याचा गजरा आणण..
सहजपणे माझ्या केसात तो माळण ...
आणी अलगद डोळे मिटून ...
त्याचा गंध उरात भरून घेण ....
अवघ्या दीड मिनिटान्ची सर्कस ...
अन् मादक त्या सुगंधाने
बघ कशी किमया केली ...
संवाद झाला परत सुरु आपला ..
मुक्या मुक्याने ...


सुनील जोशी
२३/०८/२००९

मोगराच तो ....

मोगराच तो ....
त्याचा गंध दरवळणारच...
दरवळणारा गंध धुंदही करणारच ....
काय सुगंधी होते ते दिवस
त्या मोगरयाने नटलेली सुगंधी मी
अन् त्या सुगंधाने धुंद तू

रोज कामावरून येतांना
आठवणीने आणायाचास माझ्यासाठी गजरा
मला गंधीत करून स्वत धुंद व्ह्यायसाठी

मग उगवल्या त्या काळ रात्री ...
ते कठीण दिवस ..तो त्रास... ती परवड
दोन जीवांची जाताना मी...
परत आले एकटी ...
एकटीच तनाने अन् मनाने खचलेली ...
तू वरवर गंभीर ..पण आतून पार हललेला

माझ्या त्या पार हरवलेल्या रुपाला बघून
अस्वस्थपणे वावरणारा ...
त्या कठिण दिवसात मला संभालून घेत
माझ्या लाम्ब सड़क वेणिचा झालेली
उंदराची शेपटी बघून उसासे सोडणारा ....

त्या दिवशी अचानक तू गजरा घेउन आलास....
आणि लक्षात आल्या बरोबर
त्या गजरयाला खिशाताच चुरगळुन टाकलास ...
पण मोगराच तो ..बेईमान झालाच
गंध तोच ...पण धुंदी उतरवून गेला

आजकाल तू गजरा आणत ही नाहीस
मी सुगंधी होत ही नाही ...
आणी तू पण धुंद होत नाही
धुंद होत नाहीस.....


सुनील जोशी
१८/०८/२००९

....आठव ......

परस दारी बहरलाय मोगरयाचा ताटवा ...
गंध धुंद करून टाकतोय बघ कसा ...
आज काल त्याच्या प्राक्तनी बघ
फ़क्त देव घरातले देवच पूजण आलय...

आपलं नवं नवं लग्न झालं ...
सासुबाईन्नी कौतुकानं केला होता गजरा
ह्याच मोगरीच्या फुलांचा ...
आणी तू पण किती हौशीनं माळला होतास
माझ्या लांब सड़क वेणीत ...
आणी मग हरखून गेलेले मी ...
आणी त्या गंधाने धुंद झालेला तू ...

तुला आवडतं म्हणून ...
दिली आहुती एक दिवस मी
माझ्या त्या लांब सड़क केसांची
त्या आठवणी अन् भावना उरात कोंडून
जपून ठेवत उरी... वाहू दिल्यात आसवांसकट
तुला दिसू ना देता ...
बॉब कट केला फ़क्त तुला आवडतो म्हणून ...
घरी आले बॉब करून .. आतून रडतच ...
अन् कित्त्ती बोलणी खाल्लीत...फ़क्त तुझ्यासाठी

आज फिरून इतक्या वर्षांनी
आज ...तो मोगरा बेईमान झाला
देवघरातल्या देवांना पुरून उरला
त्याचा तोच गंध ... करतोय धुंद ...
त्या व्याकुळ आठवणी ...
सहन करते मी फ़क्त तुझ्याच साठी रे
फ़क्त तुझ्याच साठी...


सुनील जोशी
१७/०८/२००९

उपरती

तू ना आता कसाही वागलास माझ्याशी
तरी मी तुझ्याशी चांगलच वागणार आहे ....

तू कसा छान वागायचास आधी ...
तो मोगरा सुगंधी आणून माळायचा
माझ्या त्या लांब सड़क केसांत ....

मीच करंटी होते रे ....
फैशन च्या नादात ... बॉय कट केला ...
अन् त्यानंतर तू किती भड़कलास ...
तुझ्या चेहेर्यावरचे उडालेले रंग
कोण गुदगुल्या झाल्या होत्या मला ...

दिवस धकत गेलेत ..वर्ष सरत गेलीत...
आता बाजारात गजरे दिसलेत ना ...
की मला तुझा म्लान चेहरा दीसतो
त्या चेहेर्यावरचा तो सात्विक संताप
आणी मग हळु हळु वाढत जाणारा तो तामसी क्रोध ...
कुठं कुठं कमी नाही पडले मी तुला चिथावण्यात ....

सगळा उंदरा मांजरा चा खेळ खेळत अन् खेळवत होते

आज एकदम उपरती झालीये ....
मी आता ठरवून टाकलय...की ...
तू ना आता कसाही वागलास माझ्याशी
तरी मी तुझ्याशी चांगलच वागणार आहे ....
जसं जमेल तसं तुझं मन जिंकायचा प्रयत्न करणार आहे ....

सुनील जोशी
१७/०८/२००९

काय चुकलय माझ?

मी बसलेय मान खाली घालून ...
माहीत नाही काय चुकलय माझ ...

मी ओळखत सुद्धा नव्हते
त्यांना आणी त्यांच्या त्या तसल्या स्पर्शाना...
पण कळत होत आणी नकोसे पण वाटत होत ...

शाळेत जाणारी मी एक अजाण अबोध ....
आता शाळा पण बंद झालिये...
मी तर काहीच केल नाहीये ... कसे सांगू?...

मैत्रीणीन्नी पण साथ सोडली आहे माझी
काल पर्यंत लाड करणार्या काकू पण
कश्या वेगळ्याच बघताहेत ....
आई सुद्धा रडत असते सतत ...

दुखते आहे मला आणी हिच्या डोळ्यात पाणी...
मी तर काहीच केल नाहीये ... कसे सांगू?...

मी म्हणाले तिला .. आई तू कशाला रडतेस?
मी सहन करेल ना हे दुखण.....
रडत रडतच आई बोलली .....बाळ...
दोन दिवसंच नाही ग ...जन्मभराच ग आहे ते दुखण.
बाबा सुद्धा उदास उदास आणी घर पण भासतय भकास .....

मला कळत नाहीये काय चुकलय माझ?
मी तर काहीच केल नाहीये ... कसे सांगू?...


सुनील जोशी
२८/०८/२००८

मी कान्हा विश्वाचा

मी कान्हा विश्वाचा

सखे तू राधा गोकुळीची
अन् मी कान्हा विश्वाचा

तुझ्या गोकुळ वाटा कठीण फार
क्रमिता क्रमिता दमलीस तू

मी विश्वरूपी विश्वाधार ....
विश्व भासे मज सरळ सोपे फार
मजला चिंता त्या विश्वाची
अन् तुझ्या आसवांच्या उत्सवात तू रममाण
माझी दृष्टी जाहली विश्वमयी
परी दिसलेत ना मला आसू तुझे?

तुझ्या त्या आसवांची शपथ सखे ...
मी....मी....... मी ..पुरता वाहून गेलोय
त्या आसवांच्या महापुरात ...
अन् सापडेनासा झालोय मलाच माझा..
तुझी शपथ राधे ....

मी कान्हा विश्वाचा


सुनील जोशी
२८/०७/२००८

अभंग क्र.३

संतांचा विट्ठल
भक्तांचा विट्ठल
चरा चरा माजी
विट्ठल विट्ठल//1//

भक्तांच्या कारणे
युगे अट्ठावीस
उभा विटेवरी
विट्ठल विट्ठल//2//

सकल संतांचा
सावळा विट्ठल
परब्रह्म रूप
विट्ठल विट्ठल//3//

आषाढी कार्तिकी
वाळवंटी उभा
भक्तांच्या स्मरणे
विट्ठल विट्ठल//4//

वारीच्या निमित्ये
जमती भक्तगण
गर्जीती नामघोष
विट्ठल विट्ठल//5//

करविण्या भेट
आत्म्या परमात्म्या
आनंद निधान
विट्ठल विट्ठल//6//

सुनील जोशी
२३/०६/२००९

अभंग क्र. २

सावळे ते रूप
गोजिरे सगुण
उभे भीमेकाठी
भक्ताचिये भेटी

आषाढी कार्तिकी
भक्तांची ही दाटी
प्रेम आलिंगीती
चंद्रभागे तटी

चन्द्रभागे तिरी
करुनी रिंगण
वाळवंटी नाचे
वैष्णवांचा मेळा

पुंडलिका साठी
उभा जगजेठी
युगे अट्ठाविस
विटेवरी

विटेवरी विठू
वामांगी रखमा
शोभतसे द्वैत
पंढरिसी .....


सुनील जोशी
२३/०६/२००९

अभंग क्र. 1

ज्ञानेशाची ओवी
तुकयाचा अभंग
रंगी रंगे श्रीरंग
भक्त भजनी दंग

टाळ मृदुन्गाचा
वाळवंटी गजर
धरुनी ते रिंगण
नाचती वारकरी

वाळवंटी होय
वैष्णवांचा मेळा
गोरा अन् काळा
भेद नाही

चंद्रभागा तीरी
जयघोष करिती
उभा तो विटेवरी
जगजेठी ....


सुनील जोशी
२३/०६/२००९