Sunday, August 3, 2014

काही चारोळ्या .....


१. अक्षर अक्षर जोडिले
शब्द शब्द जुळविले
ओतुनी भाव शब्दात त्या
अव्यक्त व्यक्त जाहले ....

सुनील जोशी
०४/०४/२०१२

२)
व्याख्याच स्वतःची
अवघडत जात आहे
कळेना मलाच माझे
नेमका कसा मी आहे

सुनील जोशी
०४/०४/२०१२

३)
तुटलेल्या फांदीला आता
कावळ्याचिच वाट आहे
शहाणा कावळा मात्र आता
त्याच फांदीला टाळतो

सुनील जोशी
०४/०४/२०१२

४)
मोडले तर आहेच रे मी
एका धक्क्याची वाट आहे
बिना धक्क्याने ही पडेन रे मी
तुझ्या स्पर्शाची आंस आहे ...

सुनील जोशी
०४/०४/२०१२
5. )

प्रेमात तू वागत असतेस
अगदी क्षितिजा सारखी
वाटते तू जवळ यावीस
दूर पळतेस अगदी क्षितिजा सारखी....

सुनील जोशी
०५/०४/२०१२

सांडले चार थेंब पावसाचे
अन धरेला आली तरारी
सोडला एक निश्वास चिंब
अन अवचित दरवळला मृदगंध.....

सुनील जोशी
२१/०४/२०१२
 
 मृत्यो अरे येऊ नको
ऐसे कधी मी बोललो ?
सरणावरी चढूनीही
उन्मुक्त मी रे हासलो
 
 
 दिवसाच रात्रीचे वार झाले
एका कळीचे फुल झाले
कोमेजल्या त्या फुलास कळले
आता जगणेच बाकी राहिले


मृत्यो तुला उगा बदनाम केले
या जगण्याने ऐसे छळीले
सरणावरी आज उमजले
मरून जगणे बाकी राहिले
 
 आभाळातील आटले पाणी
नळातील हि आटले पाणी
दुष्काळ भारी हा असा कि
डोळ्यातीलहि  आटले पाणी

 सुनील जोशी
१७/०३/२०१३
 
 1.
पायात सुखाचे पैंजण रूणझुणतांना
अवचित रुततसे कंटक त्या पायांना
हसता हसता रडणे असेल प्राक्तना
कां खेळविसी खेळ असा रे नंदनंदना
 
 1.
पापणित तो लपून बसतो
माझा एक आसू ही तो असतो
जागे पणी तर नाहीच नाही
पण स्वप्नात ही तो सोडत नसतो...

2.
तृप्तता जळण्यात नसते
तृप्तता हसण्यात नसते
तृप्तता मनात असते
आपलीआपल्यालाच शोधायची असते

3.
व्यक्त मी आणि अव्यक्त ही मीच
बंधनी मी आणि मुक्त ही मीच
माझ्या मनाचे हें खेळ सारे
अडकलो असतो त्यातही मीच

4.

हसताना आपण मनमोकळ हसावं
रडतानाअगदी धाय मोकलून रडावं
करायचं ठरवतो ना जे आपण, असं करावं
जगताना कसं... असं दिलखुलास जगावं



सुनील जोशी
२१/१२/११



अमर कथा भूतली साकारली
कि उगा राधा बदनाम झाली
कळले न कळले जरी त्या राधेला
सहज ती कृष्णात रममाण झाली

सुनील जोशी

No comments:

Post a Comment